|| श्री देव वेळणेश्वर महाराज प्रसन्न ||

|| श्री देव वेळणेश्वर महाराज प्रार्थना आणि घाग परिवाराचा जागर ||
|| श्री देव वेळणेश्वर प्रार्थना ||
एक अदभूत आणि रोमहर्षक प्रार्थना, जिचे स्मरण केल्याने श्री देव वेळणेश्वराचे कृपा-आशिर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहतात!!!
|| सुमधुर श्री देव वेळणेश्वर प्रार्थना ||

आमची प्रार्थना संगीतमय केल्याबद्दल शतश: धन्यवाद!!!

गीतकार - CA श्री संतोष गोरखनाथ घाग

संगीत - श्री मुकुंद मराठे

सहभाग - 'नादब्रह्म' चे कलाकर आणि श्री शिरीष घाग

|| घाग परिवाराचा जागर ||
समस्त घाग परिवाराचा चैतन्यमय आणि स्फुर्तिदायी जागर, जो आपल्याला एकत्र आणतो, आपल्या घाग परिवाराच्या उज्वल भविष्या करिता!!!

Limited editionsddd

earth inspired collection

यादवराव घाग प्रतिष्ठान

गौरवगाथा, परंपरा आणि अखंड सेवायात्रा...

द्वापारयुगाचा सुवर्णकाळ संपता-संपता, श्रीविष्णूचा अष्टमावतार- लीला पुरुषोत्तम श्रीकृष्ण, आपला भौतिक अवतार समाप्त करून वैकुंठास निघून गेले. त्यांच्या गमनानंतर यादवांच्या विशाल वंशवृक्षात अंतर्गत कलहाची भीषण ज्वाला भडकली. भ्रातृघाती संघर्ष, रणांगणातील रक्तरंजित घडामोडी, आणि अखेरीस संपूर्ण यादव वंशाचा संहार हा इतिहासाच्या पानांवर अमिट शिलालेखाप्रमाणे कोरला गेला.इतिहासतज्ञांच्या लेखणीतून नोंदले जाते की, या यादवांची वसाहत मधुरा व घागरा नदीच्या काठावरील सुपीक भूमीत होती. आणि याच घागरा नदीच्या नामधारीस अनुसरून "घाग" हे आडनाव उदयास आले, अशी प्राचीन संशोधकांची मांडणी आहे.

वंशवैभव व ओळख :

प्रख्यात इतिहाससंशोधक खंडेराव आप्पाजी मोरे (मु. दिंडोरी, नाशिक) यांच्या मान्य ग्रंथानुसार — "घाग" हे ९६ कुळी क्षत्रिय मराठ्यांमधील चौदावे कुळी यादव म्हणून गणले जातात. त्यांचे गोत्र — गार्ग्य, व देवक — रामबाण कणीस असे मानले जाते.

पुढे सातव्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीत यादव घराण्याचा उदय झाला. या वंशाचा सुवर्णकाळ म्हणजे देवगिरीच्या सिंहासनावर आरूढ असलेल्या राजा रामदेवराय यांची वैभवशाली कारकीर्द होय. परंतु इ.स. १३१८ मध्ये देवगिरीवरील यादवांचे साम्राज्य लोप पावले. त्यानंतर काही यादव व घाग बांधवांनी कोकणातील लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली या गावी पहिली वसाहत स्थापन केल्याचे ऐतिहासिक दाखले उपलब्ध आहेत.

काळाच्या ओघात त्यांपैकी काही कुटुंबे गुहागर प्रांतातील समुद्रकिनारी वसलेल्या वेळणेश्वर या स्थळी येऊन स्थायिक झाली. यानंतरच यादवराव घागांचे मूळ गाव म्हणून वेळणेश्वर याची ओळख पक्की झाली. या पवित्र स्थळी श्री शंकराचे प्राचीन व भव्य मंदिर असून, त्यामधील शिवलिंग अत्यंत विलोभनीय आणि मोहक आहे. परंपरेनुसार या मंदिराच्या मुख्य मानकरी मंडळींमधील एक मानकरी हे श्री. घाग घराण्याचेच मानले जातात.

समुद्रमार्गे वारंवार होणारी मोगली आक्रमणे व जुलमी सत्तेचा छळ यांपासून सुटका व्हावी आणि पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे या हेतुने काही घाग बांधवांनी कायमस्वरूपी स्थलांतराचा निर्णय घेतला. प्रथम त्यांनी गुहागर तालुक्यातील नरवण या गावी मुक्काम केला. पुढे काळाच्या प्रवाहात हे सर्व भाऊ (घाग) वेगवेगळ्या गावी जाऊन स्थायिक झाले. त्यांपैकी एक भाऊ मात्र आपल्या इष्टदेव वेळणेश्वर महादेवाचे मानकरी व सेवेकरी म्हणून वेळणेश्वर येथेच निष्ठेने वास करू लागले.

संकल्पनेचे प्रथम बीज :

स्वातंत्र्यपूर्व काळात, इ. स. १६ डिसेंबर १९४५ या दिवशी, आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्ववान हृदयातून "यादवराव-घाग मंडळ" या नावाने एकतेचे बीज रोवले गेले. त्या पवित्र क्षणाचे तेज आजही आमच्या स्मरणांत सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. तेव्हाच्या या कार्यात पुढाकार घेणाऱ्या पुरोधा बांधवांची नावे आजही आदरपूर्वक उच्चारली जातात —

१. माधवराव हरिभाऊ घाग — हडकणी

२. आत्माराम गोविंदराव घाग — हडकणी

३. आत्माराम जयरामराव घाग — खरवते

४. कृष्णाजी सितारामराव घाग — खरवते

५. श्रीराम नारायणराव घाग — दहिवली बुद्रुक

६. अर्जुन लक्ष्मणराव घाग — दहिवली बुद्रुक

७. भिकाजी अंबाजीराव घाग — गुळवणे

८. महादेव राजारामराव घाग — काटवली

९. शांताराम गंगारामराव घाग — नायशी

१०. माधवराव धाकोजीराव घाग — नायशी

११. बाबुराव गणपतराव घाग — नायशी

०२ मार्च १९४६, महाशिवरात्रीच्या पुण्यप्रभातीत, संस्थेची सर्वसाधारण सभा भरल्याचा इतिहास साक्ष देतो. त्या काळच्या प्रवासातील अडथळे, तुटपुंजा आर्थिक प्रवाह, आणि संपर्काची मर्यादा लक्षात घेता, ही सेवायात्रा काही काळाने विराम पावली.

नवयुगाचा उदय — २००९ :

दीर्घ अंतराळानंतर, कै. कृष्णकांत सखारामराव घाग (दहिवली बुद्रुक) यांच्या अध्यक्षतेखाली, यादवराव घाग प्रतिष्ठानच्या नवयुगाची पहाट इ.स. २००९ मध्ये उगवली. पुढे, दिनांक १९ एप्रिल २०१० रोजी ही संस्था धर्मादाय आयुक्तालयात विधिपूर्वक नोंदणीकृत झाली आणि त्याच दिवसापासून प्रतिष्ठानच्या प्रत्यक्ष कार्ययात्रेला अधिकृत प्रारंभ झाला. संस्थेच्या या कार्यप्रवेशानंतर सावर्डे येथे आयोजित पहिल्या कुटुंब मेळाव्यात विविध गावांतील घाग बांधव व भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला गेला, ज्याने समाजबंध दृढ होण्याच्या प्रक्रियेला ऐतिहासिक वेग प्राप्त झाला. त्या मेळाव्यात सहभागी झालेले गाव —

१. श्री क्षेत्र वेळणेश्वर

२. दहिवली बुद्रुक

३. दहिवली खुर्द

४. खरवते

५. हडकणी

६. नायशी

७. काटवली

८. गुळवणे

९. सालपे

१०. सोनगाव

११. उसर खुर्द (मूळ गाव — खरवते)

कै. कृष्णकांत सखारामराव घाग (दहिवली बुद्रुक) यांच्या देहावसानानंतर, श्री. राजेंद्र हरिश्चंद्रराव घाग (वेळणेश्वर) यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेत कार्यास नवचैतन्य दिले. पुढे ते विश्वस्त प्रमुख झाले आणि अध्यक्षपदाची जबाबदारी श्री. वीरधवल सितारामराव घाग (नायशी) यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आजतागायत यशस्वीरित्या पार पडत आहे.

ध्येयध्वज :

यादवराव घाग प्रतिष्ठान ही एक केवळ संस्था नव्हे, तर बंधुभाव, संस्कृतीसंवर्धन व समाजबंधाच्या पवित्र धाग्यांनी विणलेली अखंड सेवायात्रा आहे. धर्म, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरण या सर्व क्षेत्रांत संस्थेचे कार्य सातत्याने फुलत आहे.

प्रमुख उपक्रम —

१. संपर्क अभियान व जनजागृती

२. करिअर मार्गदर्शन व प्रेरणाशिबिरे

३. घाग परिवार मेळावा

४. वधू–वर परिचय मेळावा

५. श्री क्षेत्र वेळणेश्वर महाराज महारुद्राभिषेक

६. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व गौरव

७. वार्षिक पारिवारिक स्नेह-सम्मेलन

८. आरोग्य शिबिरे व वैद्यकीय सेवा

९. चिंतन शिबिर — नेतृत्व व संघटनकौशल्य विकास

१०. क्रीडा स्पर्धा

आमचा गौरवशाली इतिहास

आम्हाला अभिमान आहे घाग कुळामध्ये जन्म घेतल्याचा आणि आमच्‍या एकीचा !!! समस्त घाग परिवाराचे स्नेह, प्रेम आणि एकी ही सन १९४६ आणि त्या पूर्वीपसून अबाधित आहे आणि अशीच ती भविष्यात राहिल हीच श्री देव वेळणेश्वर चरणी प्रार्थना !!!

स्वप्न-पूर्ती - यादवराव घाग संकुल

घाग परिवाराचे संकुल व्हावे हि समस्त घाग बंधूंची इच्छा अखेरीस पूर्णत्वास आली ह्या विशाल आणि ऐतिहासिक वास्तूमुळे जी समस्त घाग परिवाराचा अभिमान आहे |||